तमिळ भाषिक सफाई कामगारांना मराठा सर्वेक्षणाचे काम
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई महानगरपालिकेने कर्मचारी, अभियंत्यांबरोबरच सफाई कामगारांनाही मराठा सर्वेक्षणाच्या कामाची जबाबदारी सोपविली असून निरक्षर असलेल्या तमिळ भाषिक सफाई कामगारांची या कामासाठी नियुक्ती होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम नक्की योग्य पद्धतीने होईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम मंगळवार, २३ जानेवारीपासून सुरू झाले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मुंबईतही सर्वेक्षण करण्यात येत असून महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते शहर, उपनगर जिल्ह्यांमध्ये मराठा सर्वेक्षण करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित करण्यात आलेले प्रश्न प्रगणक व पर्यवेक्षक नागरिकांना विचारणार आहेत. या माध्यमातून आवश्यक ती माहिती गोळा करण्यात येणार आहे.
हे काम महानगरपालिकेच्या अभियंत्यांबरोबरच आरोग्य सेविका, शिक्षक आणि सफाई कामगारांनाही देण्यात आले आहे. हे काम २३ ते ३१ जानेवारी या काळात होणार आहे. त्याकरीता महानगरपालिका प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये निरक्षर सफाई कामगारांचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी याबाबत सांगितले की, हरिजनकुमार आनंद, देवेंद्र मुत्तुस्वामी आणि देवेंद्र अरमुगम या तीन सफाई कामगारांना हे काम देण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.