सहायक पोलीस आयुक्तांकडून आत्महत्येचा प्रयत्न?
पुणे : खरा पंचनामा
पुणे शहर पोलीस दलातील एका सहायक आयुक्तांनी इमारतीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा पोलीस दलात दबक्या आवाजात सुरू आहे. गंभीर गुन्ह्यात वेळेत दोषारोपपत्र दाखल न झाल्याने आरोपींना जामीन मिळाला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या सहायक आयुक्तांची कानउघाडणी केली होती. त्यामुळे सदनिकेतील गॅलरीतून उडी मारून सहायक आयुक्तांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. मात्र, असे काही घडले नसून, गॅलरीत पाय घसरून अपघात घडल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
टोळीयुद्धातून तीन महिन्यांपूर्वी एका तरुणाचा खून झाला होता. या गुन्ह्यात सराईतासह साथीदारांविरुद्ध न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नव्हते. परिमंडळ एकमधील एका सहायक पोलीस आयुक्तांकडे गंभीर गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला होता. दोषारोपपत्र वेळेत दाखल न झाल्याने सराईतासह साथीदारांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्तांची कानउघाडणी केली होती. सहायक आयुक्त सोमवारी गॅलरीतून तोल जाऊन पडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने स्थानिक पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, दोन पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्तांनी रुग्णालयात धाव घेतली. उपचारासाठी दाखल झालेल्या सहायक आयुक्तांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट घेतली. अधिकाऱ्याला धीर देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची कोठेही वाच्यता करू नका, असे सहायक आयुक्तांना सांगितले. दरम्यान, सहायक आयुक्त गॅलरीत पाय घसरल्याने पडले असून, त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.