खेड पोलिस कोठडीतील आरोपीचा संशयास्पद मृत्यू!
नातेवाईकांचा कोल्हापुरात सीपीआरमध्ये गोंधळ
कोल्हापूर : खरा पंचनामा
सोने, चांदी पॉलिश करून फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील एका संशयिताचा मंगळवारी उपचारादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
मोहंमद सुबेर इम्रान शेख (वय २८, रा. तुलसीपूर जमुनिया, जि. भागलपूर, बिहार) असे मृत संशयिताचे नाव आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजे सीपीआरमध्ये शवविच्छेदन करताना गुरुवारी सकाळी मृताच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत, खेड पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस बंदोबस्तात शवविच्छेदन करण्यात आले.
दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून महिलेला बेशुद्ध करून दागिने लुटल्याचा प्रकार ८ जानेवारीला खेडमध्ये घडला होता. या घटनेत ४ लाख ८० हजार इतक्या किमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या व २ सोन्याच्या पाटल्या घेऊन आरोपी पळून गेले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी २१ जानेवारीला नाशिक येथून एका टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले होते.
यात मोहंमद सुबेर इम्रान शेख (वय २८) याच्यासह साजिद लाडू साह (२४), मोहंमद आबिद इल्यास शेख (२९), महंमद जुबेर फती आलम शेख (३२, सर्व रा. तुलसीपूर जमुनिया, जिल्हा भागलपूर, राज्य बिहार) तसेच नंदकुमार श्रीरंग माने (५०, रा. मनमाड शिवाजी चौक, ता. नांदगाव, जि. नाशिक) यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली होती.
या टोळीने महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात एकूण २१ महिलांची अशाप्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये नाशिक, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, जालना व संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर हे आपल्या पथकासह या गुन्ह्याचा तपास करत होते. कोठडीदरम्यान पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे शेख याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
शवविच्छेदन करण्यापूर्वी खेड पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेऊन नातेवाईकांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गोंधळ घातला. हा प्रकार लक्षात येताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश कवठेकर, सीआयडीच्या निरीक्षक वैष्णवी पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सीपीआरमध्ये धाव घेऊन मृताच्या नातेवाईकांशी चर्चा केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांसह शीघ्र कृती दलाची एक तुकडी सीपीआरमध्ये तैनात केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.