Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गत वर्षभरात गुन्हेगारी रोखण्यात सांगली पोलिस दलाला यश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची माहिती

गत वर्षभरात गुन्हेगारी रोखण्यात सांगली पोलिस दलाला यश
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची माहिती



सांगली : खरा पंचनामा

गत वर्षी खुनाच्या घटना १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आर्थिक कारणासह जमिनीच्या वादातून अधिक खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. सर्वच खुनांचा छडा लावण्यात आला आहे. अन्य गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिस दलाला यश आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, प्रामुख्याने मालमत्तासंदर्भातील गुन्ह्यांचा तपास तातडीने लावावा, यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्यानेच त्यातील संशयितांना जेरबंद करण्यात यश आले. मालमत्तेच्या गुन्ह्यातील ६ कोटी ७४ लाख १९ हजार ६८२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दुसऱ्या बाजूला रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणी चोरीस गेलेला लाखोंचा ऐवज जप्त करण्यात लवकरच पोलिस यशस्वी होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. अपहरण, बलात्कार यात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. तेली म्हणाले, मागील वर्षी पोलिसांना तपासकामात आव्हान देणाऱ्या दोन घटना घडल्या. सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवरील दरोडा आणि जत येथील विजय ताड खून प्रकरण यांचा समावेश आहे. दरोड्यातील चार संशयितांना पकडण्यात यश आले असून एकाचा लवकरच ताबा घेतला जाईल. जत येथील विजय ताड खून प्रकरणातील मुख्य संशयित अजून हाती आलेला नाही. त्याला न्यायालयाकडून फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

ते म्हणाले, पाच वर्षांत दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, दुचाकी चोरीच्या घटनांत घट झाली आहे. ऊस वाहतूकदारांची फसवणूक व शेअर मार्केटमधील फसवणूक यात वाढ झालीय. शहरातील चोऱ्यांच्या प्रमाणात घट होण्याच्या उद्देशाने गस्त घालण्यासाठी ४८ बीट मार्शलची नेमणूक केली आहे. त्यांना नेमून दिलेले काम ते नेटकेपणाने करतात की नाही, हे पाहण्यासाठी ‘ई-बेट’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अधिकारी लक्ष ठेवत आहेत.

वर्षभरात केलेली उल्लेखनीय कामे :
अधीक्षक कार्यालय इमारत पूर्ण, ६० पोलिस निवासस्थानांची दुरुस्ती, आटपाडी, कडेगाव, कुंडलला पोलिस ठाणे इमारत, १२०५ किलो गांजा केला नष्ट, अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा, कायदा-सुव्यवस्था राखण्यात यश, चोरीला गेलेले ५० लाखांचे मोबाईल केले परत, ऑनलाइन फसवणुकीतील १३ कोटींची रक्कम गोठवली.

भविष्यातील प्लॅनिंग : 
शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे, सखी मंचच्या माध्यमातून महिला अत्याचार रोखणार, पोलिस काका, पोलिस दीदी उपक्रम प्रभावी राबवणे, अवैध धंद्यांसह नशेखोरीला चाप लावणे, ऑनलाइन फसवणुकीसह गुन्ह्यांवर नियंत्रण, सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.