महाराष्ट्रात 'दृशम पार्ट 2'चा थरार!
12 फुटांच्या 8 खड्ड्यांमध्ये सापडली हाडं अन् झाला खूनाचा उलगडा
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा दृश्यम या चित्रपटाचा पार्ट 2 पाहायला मिळाला आहे. शहरात 14 महिन्यांपूर्वी झालेल्या खूनाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. मात्र आरोपीनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जे काही केलं ते पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. 14 महिन्यांपूर्वी शहरात अविनाश साळवे या तरुणाचा खून झाला होता. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी तब्बल 12 फुटांचे आठ खड्डे खोदले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील अविनाश साळवे खून प्रकरणात आरोपीने मृतदेह वाल्मी परिसरात जलवाहिनीच्या कामाच्या ठिकाणी पूरला होता. क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन या जागेत आठ ठिकाणी बारा फूट खोल खड्डे खोदल्यानंतर पोलिसांच्या हाती 4 ते 5 मानवी हाडे लागली आहेत.
यामुळे 14 महिन्यांपूर्वी अविनाश साळवे या तरुणाची हत्या करून त्याला पुरलेल्या घटनेचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अविनाश साळवे यांचा चुलत भाऊ राहुल साळवे याला ताब्यात घेतलं आहे. त्यानेच अविनाशचा खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी खोदकाम केलं. या ठिकाणी बारा फुटांचे आठ खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यातून पोलिसांच्या हाती चार ते पाच मानवी हाडं लागली आहेत. दरम्यान आता खड्ड्यामध्ये मिळालेले हाडांचे तुकडे फॉरेनसिक विभागाला पाठवून, DNA चाचणीनंतर ते कोणाचे आहेत हे निष्पन्न होणार आहे.
संशयित राहुल साळवे यानं 14 महिन्यांपूर्वी आपला चुलत भाऊ अविनाश साळवे याचा खून केला. त्यानंतर घटनास्थळी मृतदेह तसाच टाकून तो घरी परतला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो घटनास्थळी गेला. तेव्हा दहा ते पंधरा कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते. राहुलने या कुत्र्यांना हाकलले. तोपर्यंत त्या जागेवर केवळ हात आणि शरीराचे काही अवशेषच शिल्लक राहिले होते. उरलेले शरीराचे तुकडे त्यानं जलवाहिनीत पुरले. पोलिसांनी खड्ड्यांमधून मृतदेहाचे अवशेष जप्त केले असून, ते आता फॉरेन्सिक विभागाला पाठवण्यात आले आहेत. डीएनए चाचणीनंतरच ते नेमके कोणाचे आहेत हे स्पष्ट होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.