आरक्षणावरची 50 टक्क्यांची मर्यादा काढणार
रांची : खरा पंचनामा
इंडिया आघाडी सत्तेत आल्यास देशभरात जातनिहाय जनगणना करण्यात येईल तसेच आरक्षणावरची 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्यात येईल, अशी ग्वाही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिली. झारखंडमधील रांची येथे भारत जोडो न्याय यात्रेतील सभेत ते बोलत होते.
जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आणि ओबीसी, दलित तसेच आदिवासींच्या हक्कांबद्दल विचारले जाते तेव्हा या ठिकाणी जात वगैरे काही नाही असे मोदी सांगतात; पण जेव्हा मते मागण्याची वेळ येते तेव्हा ते म्हणतात मी ओबीसी आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
झारखंडचे मुख्यमंत्री एक आदिवासी होते. त्यामुळे भाजपने झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. दलित आणि आदिवासींच्या आरक्षणात घट होणार नाही. तसेच मागासवर्गीयांना समाजात त्यांचे हक्क मिळवून देणार याची गॅरंटी मी देतो, असेही राहुल गांधी म्हणाले.
मोदी सरकार खासगीकरणाच्या मागे लागले असून अवजड अभियंता महामंडळ लिमिटेड बंद करून ते अदानींच्या ताब्यात द्यायचे आहेत. मोदी सरकारला केवळ अदानीला फायदा करून द्यायचा आहे. तुमच्या खिशातील पैसा अदानीच्या घशात चालला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.