वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांना झटका!
आता खासगी प्रॅक्टिसला लागणार कात्री
नवी दिल्ली : खरा पंचनामा
वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापनाला टाळून खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या अध्यापकांच्या नाड्या केंद्र सरकारने आवळल्या आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) अध्यापकांच्या खासगी प्रॅक्टिसला पायबंद घालताना महाविद्यालयांतील ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. 'एनएमसी'ने 'मिनिमम स्टँडर्ड ऑफ रिक्वायरमेंट्स फॉर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस-२०२३' (पीजीएमएसआर-२०२३) या शीर्षकाखाली मागील आठवड्यामध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
या नव्या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांत कार्यरत असलेल्या अध्यापकांना खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही, प्रत्यक्ष कामाचा वेळ विचारात घेतला तर त्यांची महाविद्यालयांत ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असेल.
रुग्णालयामध्ये आता ८० टक्के बेड हे सातत्याने ज्यांना औषधोपचाराची आणि देखभालीची गरज आहे, अशा रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावे तर एकूण बेडपैकी १५ टक्के बेड हे पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी राखीव ठेवले जावे, असे सांगण्यात आले आहे. त्यातही अतिदक्षता विभागातील बेडचा अर्थात रुग्णांचा समावेश असावा, असे नमूद करण्यात आले.
रुग्णालयाची इमारत उभारताना देखील राष्ट्रीय पातळीवर निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्यात यावे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निश्चित करण्यात आलेल्या नियमांचेही पालन करावे लागेल. ज्या प्रमाणे रुग्णालयातील बेडची संख्या वाढते त्यातुलनेत कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.