नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याने संतोष कदमची गेम
पोलिस तपासात स्पष्ट, सांगलीतील तिघांचा सहभाग, दोघेजण ताब्यात
कुरुंदवाड : खरा पंचनामा
सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याने नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखो रूपयांची फसवणूक केल्यानेच त्याचा गेम झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. संतोष याच्या खुनात सांगलीतील एकूण तिघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले असून त्यातील दोन संशयितांना कुरूंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने गुरुवारी रात्री उशीरा ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित सांगलीतील प्रशिक चौक परिसरात संतोष कदम याच्या घराजवळच राहतात. तीन संशयितांपैकी दोघेजण सांगलीवाडी येथील वीट भट्टीवर काम करतात. संतोष कदम हा सांगली महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार होता. त्याची परवानगी घेण्यासाठी तो सांगली शहर पोलिस ठाण्यात गेला होता. त्याचवेळी त्याला शिरोळ तालुक्यातील आलास येथील मातीच्या औटीवरून एकाचा फोन आला होता. त्यानंतर घरात कुरूंदवाडला जाऊन येतो असे सांगून बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बाहेर पडला होता.
रात्रभर तो परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी गुरुवारी सकाळी सांगली शहर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. गुरुवारी दुपारी त्याच्याच स्विफ्ट कारमध्ये (एमएच ०९ बीबी ८०६) कुरूंदवाड-नांदणी रस्त्यावर त्याचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर कुरूंदवाड पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली होती. त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तसेच लोकेशन मिळाल्यानंतर तपासाला गती मिळाली. कुरूंदवाड पोलिसांनी आलास येथील औटीवरील एका जेसीबी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर सहायक निरीक्षक श्री. फडणीस यांच्या पथकाने सांगलीवाडीतील वीट भट्टीवर काम करणाऱ्या सांगलीतील दोघांना ताब्यात घेतले. या खुनातील एक संशयित अद्याप पसार आहे.
ताब्यात घेतलेल्या दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नोकरी लावण्यासाठी संतोषने लाखो रूपये घेतले होते. तरीही तो नोकरी लावत नव्हता तसेच पैसेही परत देत नव्हता त्यामुळेच त्याचा चाकूने भोसकून खून केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. तरीही पोलिस या खुनाचे नेमके कारण शोधण्यासाठी कसून चौकशी करत आहेत. लवकरच खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान संतोष कदम याच्यावर खंडणी, शासकीय कामात अडथळा आणणे आणि विनयभंगाचे असे एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.