Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एमडी ड्रग्ज तस्करीतला जुना खेळाडू : आयुब मकानदार २०१५ मध्येही आयुबला झाली होती अटक, गोव्यात ड्रग्ज पुरवण्याची होती जबाबदारी

एमडी ड्रग्ज तस्करीतला जुना खेळाडू : आयुब मकानदार
२०१५ मध्येही आयुबला झाली होती अटक, गोव्यात ड्रग्ज पुरवण्याची होती जबाबदारी



सांगली : खरा पंचनामा

जिल्ह्यातील कुपवाड येथे पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तब्बल १४० किलो एमडी (मेफॅड्रोन) ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी ड्रग्ज साठा करणाऱ्या आयुब मकानदार याला अटक केली आहे. तथाकथित उद्योजक असलेला आयुब एमडी तसेच केटामाईन या ड्रग्ज तस्करीतला जुना खेळाडू आहे. कुपवाडमधील हायफाय क्लबचा तत्कालीन सचिव राहिलेल्या आयुबला एका बड्या उद्योगपतीने गोव्यात माल पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. मात्र त्याला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. त्या गुन्ह्यातून तो नुकताच बाहेर आला होता. त्याने पुन्हा या धंद्यात पाऊल टाकले मात्र तो अडकला.


२०११ मध्ये डीआरआय (महसूल गुप्तचर संचलनालय) आणि केंद्रीय अबकारी विभागाने इस्लामपूर येथे नामचीन ट्रॅव्हल्स कंपनीच्या उद्योगपतीला बेकायदा केटामाईन ड्रग्ज तयार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. इस्लामपूर येथील ओंकार इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत हे ड्रग्ज तयार केल्याचे त्यावेळी तपासात स्पष्ट झाले होते. 

त्यानंतर २०१५ मध्ये त्या उद्योगपतीच्या भावाला ट्रॅव्हल्समधून ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी त्या उद्योगपतीच्या कंपनीत छापा टाकून ३५५ किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात पहिल्यांदा आयुब मकानदार याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी ड्रग्ज खरेदी करणाऱ्यांसाठी तो ड्रग्जची वाहतूक करत असल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता.

आयुब स्वतःला उद्योगपती म्हणवून घेत होता. त्याचे कोणते उद्योग होते याबाबत कुपवाडमधील अन्य उद्योगपती अनभिज्ञ होते. उद्योगपती असल्याचे सांगत त्याने कुपवाडमधील एका हायफाय क्लबमध्ये सभासदत्व मिळवले. त्यानंतर पुढे तो त्या क्लबचा सचिवही झाला. त्यावरूनही क्लबमधील काही सदस्यांमध्ये वाद झाला होता. क्लबमध्ये त्याची अनेक मोठ्या उद्योगपती, व्यापाऱ्यांशी ओळख वाढली होती. त्यातूनच त्याचा संपर्क संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक असलेल्या उद्योगपतीशी आला. आयुबने त्याच्याशी जवळीक साधली अन ड्रग्जच्या तस्करीत त्याचा सक्रीय सहभाग सुरु झाला. सुरुवातीला त्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या उद्योगपतीने त्याच्यावर गोव्यात माल खपवायची जबाबदारी दिली होती. त्यातून चांगले पैसे मिळत असल्याने आयुब ड्रग्ज तस्करीत गुरफटला गेला.


मात्र २०११ मध्ये ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला ड्रग्ज तस्करी आणि निर्मितीसाठी अटक झाल्यानंतर आयुबचे धाबे दणाणले होते. मात्र पैसे चांगले मिळत असल्याने तो या रॅकेटमध्ये काम करत राहिला. त्यानंतर २०१५ मध्ये जेव्हा या ट्रॅव्हल्स कंपनीच्या उद्योगपतीच्या कुपवाड येथील एमडी ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्यावर डीआरआय आणि केंद्रीय अबकारी विभागाने छापा टाकला. त्यावेळी आयुबला पहिल्यांदा अटक झाली. तेव्हापासून तो पुण्याच्या येरवडा कारागृहात होता. गेल्यावर्षीच तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानतर आता पुन्हा ड्रग्जचा साठा केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. एकंदरीत पूर्वी ड्रग्जच्या गुन्ह्यात अटक होऊनही पुन्हा तोच गुन्हा करण्याचे धाडस करणारा आयुब ड्रग्ज तस्करीतला जुना खेळाडू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

येरवड्यात ड्रग्ज तस्करांशी जुळले कनेक्शन
तब्बल आठ वर्षे येरवडा जेलमध्ये आयुब होता. यावेळी त्याचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन जुळले होते. त्यातूनच त्याने काही लाखांसाठी ड्रग्जचा साठा करण्याचे काम घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील गुन्ह्यात ट्रॅव्हल्स कंपनीच्या उद्योगपतीसह त्याला कारागृहाची हवा खायला लागली असतानाही त्याने पुन्हा या व्यवसायात येण्याचे धाडस केले. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच जेरबंद केले.

अली शेख होता ड्रग्ज पाठवणारा मध्यस्थ
दरम्यान पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीत सापडलेल्या ड्रग्जप्रकरणात अली शेख या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. या अली शेखने काही लाखांच्या बदल्यात फक्त काही दिवस ड्रग्जचा साठा करण्यासाठी आयुबला गळ घातली होती. त्यातून आयुबने कुपवाडमधील स्वामी मळ्यात एक छोटेसे घर भाड्याने घेऊन त्यात १४० किलो एमडी ड्रग्जचा साठा केल्याचे पोलिसांच्या छाप्यात निष्पन्न झाले आहे. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.