जयसिंगपूरच्या तलाठ्यासह महसूल लिपिकाला अटक
सांगलीतील तक्रारदाराकडे मागितले २७ हजार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
कोल्हापूर ः खरा पंचनामा
सातबाऱ्यावरील काही नोंदी बदलण्यासाठी तक्रारदाराकडे २७ हजार पाचशे रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी जयसिंगपूरच्या तलाठ्यासह शिरोळ तहसील कार्यालयातील लिपिकाला सोमवारी अटक करण्यात आली. कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
तलाठी स्वप्निल वसंतराव घाटगे (वय ३९, रा. रूकडी, ता. हातकणंगले), लिपीक शिवाजी नागनाथ इटलावर (वय ३२, सध्या रा. शाहू कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर, मुळ रा. कुंडलवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सांगली जिल्ह्यातील अंजनी येथील तक्रारदार यांची जयसिंगपूर येथील गट नं. ८७ मध्ये जमीन आहे. या जमिनीमधील प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याने क्षेत्रफळाची दुरुस्ती करुन नोंद घालावी. तसा सातबारा उतारा मिळावा यासाठी तक्रारदार यांनी जयसिंगपूरचे तलाठी घाटगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी घाटगे याने २२ हजार रुपयाची मागणी केली. मात्र हे पैसे शासकीय फी असावी असे समजून तक्रारदार यांनी घाटगे याला दिले होते. त्यानंतर कामाकरिता तक्रारदाराने घाटगेची पुन्हा भेट घेतली असता त्याने पुन्हा ३५ हजार रुपयांची मागणी केली.
त्यावेळी तक्रारदाराने पुर्वी पैसे दिल्याचे सांगितले त्यावर तो प्रोटोकॉल होता, असे घाटगेने सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. १६ नोव्हेंबर व ४ डिसेंबर रोजी लाचलुचपत विभागाने पडताळणी केली होती. यामध्ये तलाठी घाटगे यांनी क्षेत्रफळाची दुरुस्ती करुन उतारा देण्यासाठी २० हजार रुपये तसेच तहसील कार्यालयातील लिपिक इटलावार यांचेकरिता ५ हजार व खासगी टायपिस्ट करिता अडीच हजार रुपये अशी एकूण २७ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कोल्हापूरच्या लाचलुचपत विभागाने सोमवारी घाटगे आणि इटलवार यांना अटक केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.