Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस असल्याची बतावणी करत लुटणाऱ्या दोन सराईतांना अटक ५.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

पोलिस असल्याची बतावणी करत लुटणाऱ्या दोन सराईतांना अटक
५.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली ः खरा पंचनामा

मिरजेत पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाकडील ऐवज लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड, दुचाकी असा ५.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  

कंबर रहीम मिझार् (वय ३७), जफर मुक्तार शेख (वय ३३, दोघेही रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी रणजितसिंग सुल्यान मिरज-सांगली रस्त्याने चालत निघाले होते. त्यावेळी संशयितांनी पोलिस असल्याची बतावणी करत सुल्यान यांच्याकडील सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली होती. याप्रकरणी मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. 

पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकातील सागर लवटे यांना दोन तरूण एका दुचाकीवरून कोल्हापूरहून सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने अंकली फाटा येथे सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार दोन तरूण दुचाकीवरून आल्यानंतर पथकाने त्यांना थांबवले. त्यांची झडती घेतल्यानंतर कंबर याच्या खिशात सोन्याची चेन सापडली. त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याचा साथीदार जफर याने मिरजेत एका वृद्धाकडील चेन हातचलाखी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीची चेन, दुचाकी, रोकड असा ५.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांनाही महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर लवटे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, उदयसिंह माळी, संदीप नलवडे, अमर नरळे, आमसिद्ध खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.