जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
गडचिरोली : खरा पंचनामा
येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय शिखरदीप बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
१२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तम किसनराव श्रीरामे (३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. आत्महत्येपूर्वी त्यांनी 'माणूस मरतो पण आत्मा अमर आहे' असा स्टेटस व्हॉटस्अपला ठेवला होता.
श्रीरामे यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. राज्य राखीव दलाच्या पुणे येथील गट क्र. १ मध्ये सेवा बजावत होते. सध्या ते गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते.
जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या शासकीय निवासस्थानी शिखरदीप बंगल्यात ते सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ड्युटी संपल्यावर बंगल्यातीलच विश्रामगृहात खाटेवर झोपून स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेतली.
गोळीबाराचा आवाज आल्यानंतर इतर सुरक्षा रक्षक धावत आले तेंव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या घटनेआधी काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी संजय मीणा हे सुटीवरून बाहेर गावाहून गडचिरोली येथे आपल्या शासकीय बंगल्यात पोहोचले होते. या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर धाव घेतली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.