सांगलीत तोतया पोलिसांचा धुमाकूळ!
तासगाव, मिरजेत सव्वा लाखांचे दागिने लंपास
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात तोतया पोलिसांनी सध्या धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तासगाव तालुक्यातील शिरगाव आणि मिरजेत दोन ज्येष्ठ नागरिकांना पोलिस असल्याची बतावणी करत भामट्यांनी सव्वा लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी तासगाव आणि मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिरजेतील सांगली रस्त्यावरील समर्थ हॉस्पिटल परिसरातून सकाळी साडेआठच्या सुमारास सेवानिवृत्त शिक्षक शिवहरी बंडोबा महामुनी (वय ८६) निघाले होते. त्यावेळी एकजण त्यांच्याजवळ आला. रस्त्याच्या कडेला थोड्या अंतरावर त्यांना गाठून संशयिताने त्यांना मी पोलिस असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या हातातील दोन अंगठ्या आणि गळ्यातील चेन काढून घेतली. त्यानंतर तो भामटा तेथून निघून गेला. त्याने महामुनी यांना नेमके काय सांगून त्यांच्याकडील दागिने काढून घेतले याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. याबाबत महामुनी यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तासगाव तालुक्यातील शिरगाव येथील घटनेतही तोतया पोलिसाने ज्येष्ठ नागरिकाला गंडा घातल्याचे दिसून आले. शुक्रवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास शिरगाव येथील रमाकांत सयाजीराव लोकरे (वय ७४) त्यांच्या लुना (एमएच १० ईएफ २५१५) वरून तासगावकडे निघाले होते. त्यावेळी एकजण दुचाकीवरून त्यांच्या पाठीमागून आला. त्याने लोकरे यांना थांबवले. त्यानंतर त्याने मी पोलिस असून या रस्त्यावर गांजाची वाहतूक होत आहे त्यामुळे तुमचे चेकिंग करायचे आहे असे सांगितले. नंतर लोकरे यांच्या त्यांच्या खिशातील सर्व ऐवज काढा असे सांगितले नंतर त्यांच्या दुचाकीला असलेली पिशवी तपासायची आहे असे सांगून पिशवीची तपासणी केली. नंतर त्यांच्याकडील अंगठी आणि चेन माझ्याकडे द्या असे सांगितले. ते दागिने घेऊन त्याने एका रूमालात बांधले. नंतर एक रूमाल लोकरे यांच्याकडे दिला. तुमचे दागिने व्यवस्थित ठेवा असे सांगून भामटा तेथून निघून गेला. तेथून लोकरे काही अंतरावर गेले. नंतर त्यांनी रूमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये दागिने नसल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक घेणार का दखल?
पोलिस असल्याची बतावणी करून लुबाडण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. सध्या जिल्ह्यात अनेक खासगी वाहनांच्या समोरील काचेजवळ 'पोलिस' अशी पाटील लावून फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. खासगी वाहनावर 'पोलिस' लिहण्याची परवानगी नसताना बिनधास्तपणे तो फलक वापरून जिल्ह्यात अनेक वाहने फिरत आहेत. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. किमान नूतन पोलिस अधीक्षक संदीप घुगे तरी अशा वाहनांची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.