Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्या' अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले, मृत कर्नाटकातील विजयपूरचा आर्थिक वाद, अनैतिक संबंधातून चौघांनी केला खात्मा, सर्व संशयिताना अटक सांगली एलसीबीची कारवाई

'त्या' अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले, मृत कर्नाटकातील विजयपूरचा
आर्थिक वाद, अनैतिक संबंधातून चौघांनी केला खात्मा, सर्व संशयिताना अटक
सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा


कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज ते भिवघाट रस्त्यावरील माळरानात अर्धवट जळालेला मृतदेह शनिवारी आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटली नव्हती. एलसीबी आणि कवठेमहांकाळ पोलिसांनी लगतच्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतल्यानंतर या मृतदेहाचे गूढ उलगडले. शिवाय तरूणाच्या खूनप्रकरणी कर्नाटकातील विजयपूर येथील चौघांना अटकही करण्यात आली आहे. आर्थिक वाद आणि मृताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून हा खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

मो. रफीक शब्बीर महंमदपूर (वय ३२), यासीन अल्वर बल्लारी (वय ३०), मोसीन अन्वर बल्लारी (वय २८), अल्लाऊद्दीन मेहबूबसाब बावर्ची (वय २७, सर्व रा. जेल दर्गा परिसर, विजयपूर, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मो. शरीफ हसनसाब गनवार (वय ३४, रा. विजयपूर) असे मृताचे नाव आहे. शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी नागज-भिवघाट रस्त्यावरील एका पुलाच्या कठड्याच्या कडेला अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. डिझेल टाकून तो पेटवल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले होते. मृतदेहाची ओळख पटली नव्हती. या खुनाचा तातडीने तपास करून संशयितांना अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी एलसीबी आणि कवठेमहांकाळ पोलिसांना दिल्या होत्या.

घटनेनंतर पोलिसांनी लगतच्या जिल्ह्यासह कर्नाटकातून बेपत्ता तसेच अपहरण झालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला होता. त्यावेळी विजयपूर येथील गोलघुमट पोलिस ठाण्यात एक तरूण बेपत्ता झाल्याची तक्रार दि. १४ फेब्रुवारी रोजी दाखल झाल्याची माहिती तपास पथकांना मिळाली. अमीना शरीफ गनवार हिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर सांगली पोलिसांनी विजयपूर येथे जाऊन अमीना हिला घटनास्थळाचे फोटो तसेच मृतदेहावर सापडलेल्या वस्तू तिला दाखवल्या. तिने त्या ओळखल्या. त्यानंतर पथकातील पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर रफीक महंमदपूर याच्याशी मृत शरीफ याच्याशी आर्थिक वाद असल्याचे तसेच रफीकचे अमीनाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पथकाने रफीकला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने विजयपूर येथे मृत शरीफला मारहाण करून नंतर त्याचा गळा आवळून, चाकूने छातीवर वार करून खून केल्याची कबुली दिली. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एका कारमधून नागज-भिवघाट रस्त्याशेजारी त्याचा मृतदेह फेकून देऊन डिझेल टाकून तो जाळल्याचीही कबुली दिली. त्यानंतर यातील चारही संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जतचे उपअधीक्षक सुनिल साळुंखे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, संदीप नलवडे, सागर लवटे, संदीप गुरव, विक्रम खोत, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, उदयसिंह माळी, दीपक गायकवाड, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, स्वप्नील नायकोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.