गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे : खरा पंचनामा
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. किल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.
प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळा मुथळने येथील लहान विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.
त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहीली.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त ब्रिगेडियर अनिल काकडे आणि अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ. अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला. विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.