मिरज बसस्थनकात चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक
दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली ः खरा पंचनामा
मिरज बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
विठाबाई नितीन चौगुले (वय ५०), नगिना सागर चौगुले (वय ४०, दोघीही रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सावित्री सैदु लोढे (वय ५०, रा. कागवाड, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. मिरजेतील बसस्थानकावर चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांना पकडण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते.
पथक चोरट्यांचा शोध घेत असताना मिरजेतील बसस्थानकातून चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी तीन महिला छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकातील महिला पोलिसांनी तिघींची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे रूमालात गुंडाळलेले दागिने आढळले. त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मिरज बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या पिशवी, पर्समधील दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करून महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, आमसिद्ध खोत, अमोल लोहार, बाबासाहेब माने, शुभांगी मुळीक, सपना गराडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.