Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सातारा कारागृहातील बंदी आता एका क्लिकवर घेणार माहिती; किऑस्क सिस्टीमचे उद्घाटन जिल्हा कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे

सातारा कारागृहातील बंदी आता एका क्लिकवर घेणार माहिती; किऑस्क सिस्टीमचे उद्घाटन
जिल्हा कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे



संभाजी पुरीगोसावी 
सातारा : खरा पंचनामा

सातारा जिल्हा कारागृहातील बंदींना त्यांची गुन्ह्यांबाबतची सर्वतोपरी माहिती मिळण्यासाठी "किऑस्क सिस्टीम"  सातारा जिल्हा कारागृहात कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर किऑस्क सिस्टीमचे उद्घाटन सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश-1, श्रीमती कमला बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. 

या किऑस्क सिस्टीमद्वारे बंदींना ते कारागृहात कोणत्या गुन्ह्यात आले, त्यांना अटक केव्हा झाली, कारागृहात दाखल केव्हा झाले,  त्यांच्यावर कोणत्या पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे, कोणत्या पोलीस स्टेशनचे  किती गुन्हे त्यांच्यावर आहेत,  त्यांच्याजवळ त्यांच्या अकाउंटला खाजगी रक्कम किती आहे, किती खर्च झाला, न्यायालयाची मागील कोर्ट पेशीची तारीख काय होती. तसेच न्यायालयाची पुढील कोर्ट पेशीची तारीख काय असेल याबाबतची सर्व माहिती या किऑस्क सिस्टीमद्वारे बंदींना मिळणार आहे. 

यावेळी श्रीमती बोरा म्हणाल्या, कारागृह प्रशासनाने बंदिंसाठी अशी यंत्रणा उभी करून खूपच चांगली सुविधा निर्माण करून दिली आहे. यामुळे बंदींना त्यांच्या बाबतच्या सर्वतोपरी माहिती त्यांना मिळण्यास मोलाची मदत होईल. कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी सांगितले की, किऑस्क सिस्टीमद्वारे कारागृहातील सर्वच बंदी त्यांच्या गुन्ह्यांचे स्टेटस यामध्ये पाहू शकतात. त्याचबरोबर त्यांचे पैसे, नातेवाईक भेटी, वकील भेटी, गुन्ह्यांच्या तपशील इत्यादी सर्वच बाबी ते पाहू शकतात. त्यामुळे सदरची माहिती घेण्यासाठी कारागृहात यापूर्वी होत असलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जांची संख्या कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल. सदरची माहिती ही प्रत्येक बंद्याला त्याच्या स्वतःचा "थम इम्प्रेशन" देऊन स्वतः घेता येत असल्यामुळे त्याला आता न्यायालयीन प्रक्रिया संबंधितची माहिती घेण्यासाठी कोणताही अर्ज किंवा माहिती अधिकाराचा अर्ज करण्याची आवश्यकता पडणार नाही.

यावेळी जिल्हा न्यायाधीश कमला बोरा जिल्हा न्यायाधीश, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, राजेंद्र भापकर, हेमंत यादव, नानासो डोंगळे, राकेश पवार, चेतन शहाणे, चांद पटेल, प्रभाकर माळी, प्रतीक्षा मोरे, रूपाली नलवडे, अंकिता करपे आदी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.