अजितदादांचे लोकसभेचे 6 उमेदवार ठरले?
मुंबई : खरा पंचनामा
भाजपने आपल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर करुन टाकली. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांच्या उमेदवार यादीकडे लागले आहे. अशातच अजितदादा गटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या नव्या फॉर्म्युलानुसार भाजप 30, राष्ट्रवादी काँग्रेस ७ आणि शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा येण्याची शक्यता आहे. मात्र, अजित पवार गट आणखी दोन जागांसाठी अडून बसला आहे. अजित पवार गटाने आता एकूण 9 जागांची मागणी लावून धरली आहे. यापैकी 6 जागांवरील उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे.
अजित पवार गटाच्या उमेदवार निश्चित झालेल्या जागांमध्ये रायगड, बारामती, शिरुर, सातारा, धाराशीव आणि परभणीचा समावेश आहे. यापैकी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यास उदयनराजे भोसले यांना भाजपकडून निवडणूक लढवता येणार नाही. अजितदादांकडून साताऱ्यातून रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. तर नाशिक, बुलढाणा आणि गडचिरोलीवरून रस्सीखेच सुरु आहे. या तिन्ही जागा आपल्याला मिळाव्यात असा अजित पवारांचा आग्रह आहे. या तीन जागांपैकी नाशिक आणि बुलढाण्याची जागा सध्या शिंदे गटाकडे आहे, तर गडचिरोलीची जागा भाजपकडे आहे. अजित पवारांनी या तीन जागांवरील उमेदवारही निश्चित केले आहेत. त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजप आपल्या जागा राष्ट्रवादीला देणार का, हे पाहावे लागेल. पुढच्या दोन दिवसांत जागा वाटपाची चर्चा पुर्ण करण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर राष्ट्रवादीची यादी येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे हे 6 उमेदवार निश्चित
रायगड : सुनिल तटकरे, बारामती : सुनेत्रा पवार, शिरूर : शिवाजीराव आढळराव पाटील, सातारा : रामराजे नाईक निंबाळकर, धाराशीव : दाजी बिराजदार, परभणी : राजेश विटेकर
या तीन जागांसाठी या नावांवर राष्ट्रवादीचा आग्रह
गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम, नाशिक : समीर किंवा छगन भुजबळ, बुलढाणा : डॉ. राजेंद्र शिंगणे
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.