पोलीस स्टेशन आवारातच पोलिसावर कुऱ्हाडीनं वार
नागपूर : खरा पंचनामा
नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या वाहानचालकावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात ही घटना घडली आहे.
या घटनेत हा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झला आहे. प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे असं या कुऱ्हाडीनं हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांना पोलीस स्टेशनच्या आवारात सोडले, त्यानंतर गाडी साफ करत असताना अचानक धर्माळे यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला झाला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना कपिल नगर पोलीस स्टेशनच्या आवारात घडली आहे. धर्माळे हे नागपूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचे वाहनचालक आहेत. त्यांनी सहाय्यक आयुक्तांना वाहनातून कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोडले. त्यानंतर ते तिथेच गाडी साफ करत होते. त्यांचं लक्ष नसताना अचानक आरोपीने मागून त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांचं लक्ष नसल्यामुळे दोन घाव बसले. मात्र तिसरा वार प्रफुल्ल यांनी हुकवला, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये असलेले इतर पोलीस त्यांच्या मदतीला धावले. आरोपीला पोलिसांनी पकडले. दिलीप चुनकरे असं आरोपीचं नाव असून, प्राथमिक चौकशीत त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची माहिती समोर आली आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.