लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिस अधिकारी देणार ११५० गावांना भेटी
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती
सोलापूर : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील ११५० गावांना पोलिस ठाण्यांचे अधिकारी भेटी देतील, निर्भय वातावरणात निवडणूक पार पडेल, यादृष्टीने आदेश दिल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चोरीचे प्रमाण वाढत असून जनावरांची चोरी तथा तस्करी करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. त्याअनुषंगाने पोलिसांना गस्त वाढविण्याचेही आदेश दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वार्षिक तपासणीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. फुलारी शुक्रवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जिल्ह्यातील गुन्हेगारीसंदर्भातील माहिती दिली. यावेळी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर उपस्थित होते. तत्पूर्वी, मागील दोन दिवसांत त्यांनी बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा या पोलिस ठाण्यांना भेटी देऊन तेथील गुन्ह्यांची माहिती जाणून घेतली. शुक्रवारी त्यांनी ग्रामीण पोलिसांच्या सोलापुरातील मुख्यालयात सर्वच ठाण्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
श्री. फुलारी म्हणाले, कोल्हापूर विभागात पुण्यानंतर सोलापूर जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असून त्या प्रमाणात पोलिस ठाणे, मनुष्यबळ कमी आहे. त्यासाठी आता वाढीव पोलिस ठाणी तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला जात आहे. चिंचोली एमआयडीसीसह अन्य ठिकाणी पोलिस ठाणी नवीन होतील. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संवदेनशील गावांवर पोलिसांचे सर्वाधिक लक्ष राहणार आहे. त्याच अनुषंगाने सराईत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया देखील केल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गतवर्षीच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण फार वाढले नसून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही समाधानकारक असल्याचेही ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.