सांगलीत तरूणाचा सपासप वार करून खून
एकजण जखमी, सहा ते सात संशयित पसार, किरकोळ कारणावरून कृत्य
सांगली ः खरा पंचनामा
सांगलीतील नवीन वसाहत परिसरात किरकोळ कारणावरून एका तरूणावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला. यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेला एक तरूण जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. सहा ते सात संशयितांनी हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अश्विनीकुमार मुळके (वय ३०, रा. नवीन वसाहत, सांगली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर गणेश हातळगे जखमी झाला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात विकी पवार, कुणाल पवार, गणेश ऐवळे, अमोल कुचीकोरवी, अजय खोत, सुजित चंदनशिवे यांच्यासह अन्य अनोळखी या संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलिस हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. यातील बहुतांशी संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
गुरुवारी रात्री मृत अश्विनीकुमार त्याच्या घरासमोर थांबला होता. त्यावेळी संशयित विकी पवार तेथून दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी अश्विनीकुमार याने येथून गाडी जात नाही असे सांगितले. त्यानंतर विकीने त्याला त्याबाबत जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. नंतर विकी तेथून निघून गेला. काही वेळाने तो पुन्हा साथीदारांना घेऊन तेथे आला. त्यावेळी संशयितांनी अश्विनीकुमार याच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेला गणेश हातळगेही जखमी झाला. दोघांना तातडीने सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गणेशवर उपचार करून त्याला सोडून देण्यात आले. तर अश्विनीकुमारचा गुरुवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मृत अश्विनीकुमार याच्यावरही मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तर संशयितांमधील अजय खोत याच्यावर खुनाचा प्रयत्न, खून असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गणेश ऐवळे हाही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तिसरा संशयित अमोल कुचीकोरवी याच्यावरही मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. संशयितांच्या शोधासाठी एलसीबीसह विश्रामबाग पोलिसांची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.