उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अधीक्षक पद रिक्त!
विभागाचा भोंगळ कारभार, ठाण्याच्या उपअधीक्षकाकडे अतिरिक्त पदभार
मुंबई ः खरा पंचनामा
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यातच राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पद रिक्त आहे. या पदाचा कार्यभार सध्या ठाण्याचे उपअधीक्षक वैभव वैद्य यांच्याकडे देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारू तस्करीची शक्यता मोठ्या प्रमाणात असताना सातारा जिल्ह्याचे अधीक्षक पदच रिक्त असल्याने या विभागाच्या भोंगळ कारभाराची चर्चा सध्या होत आहे. दरम्यान मुंबई, पुण्याकडे सातारामार्गे गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याने अधीक्षक पद रिक्त ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयोगाच्या नवीन सूचनांनुसार बदल्या केल्या नसल्याचीही चर्चा आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांच्या जिल्ह्यातच अधीक्षक पद रिक्त ठेवल्याने वेगळ्याच चर्चाना उधाण आले आहे. साताराच्या तत्कालीन अधीक्षक कीर्ती शेडगे यांचा मूळ जिल्हा असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार त्यांची रत्नागिरीच्या अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या जागी अधीक्षक पद न भरता ठाण्याचे उपअधीक्षक वैभव वैद्य यांच्याकडे सातारा अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
श्रीमती शेडगे साताऱ्याच्या अधीक्षक असताना गोवा दारूची तस्करी करणाऱ्यांची पोलखोल करण्यात आली होती. त्याशिवाय दूध वाहतुकीच्या टॅंकरमधून होणारी दारू तस्करीही त्यांनी उघडकीस आणली होती. त्याशिवाय कोल्हापूर येथील विभागीय उपायुक्त आणि अधीक्षकांच्या भरारी पथकाने कोट्यवधी रूपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली होती. त्यामुळे गोव्याहून कोल्हापूर, सातारा मागेर् दारूची वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही साताऱ्याचे उत्पादन शुल्कचे अधीक्षक पद ऐन निवडणुकीच्या तोंडावर रिक्त ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्यातच कोल्हापूर विभागीय उपायुक्त यांच्या भरारी पथकाचे निरीक्षक पदही अद्याप रिक्त आहे. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. किमान आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही पदे भरली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.