बनावट सोने तारण ठेवून फसवणूकीचा प्रयत्न; कराडच्या टोळीला अटक
बनावट सोने, कार जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली ः खरा पंचनामा
शहरातील एका पंतसंस्थेत बनावट सोने तारण ठेवून संस्थेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कराड (जि. सातारा) येथील तिघांच्या टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८ तोळ्यांचे बनावट दागिने, कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिघांनाही तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
समीर काकासो मुलाणी (वय ४६, रा. घोगाव, सध्या रा. सैदापूर), आकाश अरूण सोनवले (वय ३०, रा. दह्यारी, ता. पलूस), विक्रम दिनकर भेदाटे (वय २८, रा. घोगाव, ता. कराड, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुसुंभ कल्याण निधी लिमिटेडचे व्यवस्थापक अमित माने यांनी फिर्याद दिली आहे. कुसुंभ कल्याण निधी संस्थेची सांगलीतील राजवाडा चौकात शाखा आहे. बुधवारी तिघेजण या संस्थेत गेले होते. त्यांनी त्यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या संस्थेत देऊन त्याबदल्यात कर्जाची मागणी केली.
मात्र संशयितांनी दिलेल्या दागिने बनावट असल्याचा संशय आल्याने व्यवस्थापक माने शहर पोलिसांना याची माहिती दिली. निरीक्षक मोरे यांनी तातडीने एक पथक संस्थेच्या शाखेत पाठवले. पथक तेथे गेल्यानंतर संशयितांनी दागिने घेऊन कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दागिने आणि कार जप्त करण्यात आली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी बनावट सोने तारण ठेवून संस्थेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. तिघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, सुनील लोखंडे, गणेश कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.