विट्यात घरफोडी करणाऱ्या कराडच्या एका तृथीयपंथीयास अटक
दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली ः खरा पंचनामा
विट्यातील एक घर फोडून दागिने चोरणाऱ्या कराड येथील एका तृथीयपंथीयाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीचे दीड लाखांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
कैलास उर्फ कल्याणी रविंद्र जाधव (वय २३, रा. गोवारे, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यातील चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत मिरज शहर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी अमर टॉकीजजवळ एकजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने तेथे सापळा रचला. त्यावेळी एक तृथीयपंथी तेथे थांबल्याचे दिसून आले. पथकाला संशय आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पर्सची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये दागिने आढळून आले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने विटा येथील एक घर फोडून तेथून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडील दीड लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्याला विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय कांबळे, आमसिद्ध खोत, बाबासाहेब माने, अमर नरळे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.