जातीधर्मावर मते मागाल तर खबरदार!
निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांना तंबी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
निवडणूक काळात देवदेवता, जात, धर्माच्या आधारावर सर्रास प्रचार सुरू असताना निवडणूक आयोगाने एका जुन्याच विनोदाची आज पुन्हा उजळणी केली. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर मते मागू नये आणि धार्मिक श्रद्धांची कुचेष्टा होईल असे कोणतेही वक्तव्यही करू नये, अशा सूचना आयोगाने केल्या आहेत.
याआधी ज्या स्टार प्रचारकांना आणि उमेदवारांना आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आयोगाने म्हटले आहे. याच महिन्यात आयोग लोकसभा आणि चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेबरोबरच आचारसंहिता अमलात येण्याची शक्यता आहे. त्याआधीच आयोगाने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
प्रचारादरम्यान आदर्श निवडणूक आचारसंहितेचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन केल्यास केवळ नैतिक कानपिचक्या देण्याच्या पूर्वीच्या प्रथेऐवजी, कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांच्या स्टार प्रचारकांना दिला आहे.
सार्वजनिक प्रचारात सभ्यता पाळण्याचा अर्थात तोंड सांभाळून बोलण्याचा इशारा आयोगाने राजकीय पक्षांना दिला असून, विशेषतः ज्यांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती अशा स्टार प्रचारक आणि उमेदवारांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.