दुचाकीस्वारावर हल्ला करून लुटणाऱ्या दोघांना अटक
चोरीचा मुद्देमाल जप्त, सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई
सांगली ः खरा पंचनामा
सांगली-करनाळ रस्त्यावर रात्री दुचाकीवरून घरी जाणाऱ्या एकाला अडवून त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्याकडील मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
बसुराज उर्फ बश्या कल्लाप्पा अडकई (वय २६), हणमंत मल्हारी शिंदे (वय ३५, दोघेही रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. करनाळ येथील विजय चव्हाण हे दि. ५ मार्च रोजी त्यांच्या दुचाकीवरून (एमएच ०९ डीई ९५५७) करनाळकडे निघाले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास एका नाल्याजवळ चौघांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यातील एकाने त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. नंतर एकाने त्यांच्यावर धारदार हत्याराने त्यांच्या उजव्या खांद्यावर वार केला. नंतर संशयित तेथून निघून गेले. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला संशयितांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथक त्यांचा शोध घेत असताना दोघेजण माधवनगर येथे चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ मोबाईल सापडला. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी दुचाकीस्वाराकडून तो जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली. मोबाईल जप्त करून दोघांनाही अटक करण्यात आली. दोघांनाही दि. २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सांगली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज पाटील, प्रियांका बाबर, मेघराज रूपनर, महेश जाधव, बंडू पवार, अमोल क्षीरसागर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.