सांगलीत दोन लिपिकांची फ्री स्टाईल!
मार्केट यार्डजवळील एका शासकीय कार्यालयातील प्रकार, वरिष्ठांकडे तक्रारी
सांगली ः खरा पंचनामा
शहरातील मार्केट यार्डजवळ असणाऱ्या एका शासकीय कार्यालयात दोन लिपिकांमध्ये चांगलीच 'फ्री स्टाईल' झाली. वरीष्ठ तसेच अन्य अधिकाऱ्यांच्यासमोरच या दोघांमध्ये चांगलीच जुंपली. त्यांच्यातील या 'फ्री स्टाईल'चे कारण गुलदस्त्यात असले तरी आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याची चर्चा संबंधित विभागात आहे. 'फ्री स्टाईल' करणारे दोघेही कोल्हापूरचे असल्याने त्यांच्या कोल्हापुरी रांगड्या भाषेने उपस्थितांचे कान मात्र 'गरम' झाले होते. दरम्यान दोघांनीही वरिष्ठांकडे तक्रारी केल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराची दखल वरीष्ठ अधिकारी घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातून शेकडो कोटींचा महलूस गोळा करणारे एक शासकीय कायार्लय मार्केट यार्डजवळ आहे. या कार्यालयात संबंधित विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी, दुय्यम अधिकारी तसेच लिपीक वर्ग काम करतो. येथे कार्यालयाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची सतत ये-जा असते. गेल्या आठवड्यात कार्यालयातील प्रमुखांच्या दालनासमोरच या कार्यालयातील दोन लिपिकांमध्ये चांगलाच वाद झाला. या वादाचे रूपांतर हातघाईत झाले. नंतर तर तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसमोरच त्यांच्यात 'फ्री स्टाईल' सुरू झाली. यावेळी त्यांनी अस्खलित गावठी मराठी शिव्यांचा एकमेकांवर भडीमार केल्याचेही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
या दोघांमध्ये 'फ्री स्टाईल' सुरू असताना त्यांचा रूद्रावतार पाहून तेथे उपस्थित एकानेही भांडण सोडवण्याचे धाडस केले नाही. जिल्ह्याच्या प्रमुखांच्या कार्यालयात त्यांच्या दालनासमोरच हा प्रकार बराच वेळ सुरू होता. काही वेळाने दोघेही शांत झाले. मात्र त्यांची कोल्हापुरी रांगड्या भाषेत एकमेकांचा उद्धार करण्याची शाब्दिक चकमक सुरूच होती. हा प्रकार झाल्यानंतर यातील एकजण कार्यालयाकडे फिरकला नसल्याचीही चर्चा आहे. तर दोघांनीही याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे समजते. दरम्यान कार्यालयीन वेळेत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीतच जिल्ह्याच्या प्रमुखांच्या दालनासमोर झालेल्या या प्रकाराची संबंधित खात्याचे वरीष्ठ अधिकारी दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.