Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली जिल्ह्यात पुन्हा १०० किलो एमडी ड्रग्ज जप्त! कवठेमहांकाळमधील इरळीत मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई, कंपनीचा पर्दाफाश

सांगली जिल्ह्यात पुन्हा १०० किलो एमडी ड्रग्ज जप्त!
कवठेमहांकाळमधील इरळीत मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई, कंपनीचा पर्दाफाश



सांगली ः खरा पंचनामा

कुपवाड येथे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा जिल्हा एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अद्याप सुरू आहे. इरळी येथील मुद्देमाल तपासण्याचे काम सुरू असून अंदाजे १०० किलो एमडी ड्रग्ज सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारखान्याचा मालक कवठेमहांकाळ येथील असल्याचे समजते.

गेल्या महिन्यात पुण्याच्या क्राईम ब्रांचने कुपवाड येथे साठा केलेला तब्बल तीनशे कोटी रूपये किमतीचे १४० किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी ड्रग्ज प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आयुब मकानदार याला अटक करण्यात आली होती. २०१५ नंतर सांगलीचे एमडी ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले होते. दरम्यान आता मुंबई पोलिसांनी तर या कारवाईचा कळस गाठला आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाने जिल्ह्यातील ड्रग्ज निर्मितीचा कारखानाच उध्वस्त केला आहे.  

कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती निरीक्षक उबाळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्यासह पथकाने रविवारी रात्रीपासून इरळी येथे ठाण मांडले आहे. इरळीतील एका शेतात एमडी ड्रग्ज निर्मितीचा गोरखधंदा सुरू होता. क्राईम ब्रांचच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या मुंबई क्राईम ब्रांचचे पथक तेथील मुद्देमालाचा पंचनामा करत असून पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार १०० किलोहून अधिक वजनाचे एमडी ड्रग्ज येथे असल्याची माहिती आहे. दरम्यान इरळीतील कारखान्याचा मालक हा कवठेमहांकाळ येथील असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक उबाळे यांनी सांगितले. 

मुंबई क्राईम ब्रांचचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे, निरीक्षक आत्माजी सावंत यांच्यासह आठ ते दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक ही कारवाई करत असून अजूनही ती सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.