Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या प्रवीणला एका किलोमागे मिळत होते लाख रुपये उत्तर प्रदेशात प्रशिक्षण घेऊन इरळीत एमडीचा कारखाना उघडला

सांगलीच्या प्रवीणला एका किलोमागे मिळत होते लाख रुपये
उत्तर प्रदेशात प्रशिक्षण घेऊन इरळीत एमडीचा कारखाना उघडला



मुंबई : खरा पंचनामा

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने सांगली येथील एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उद्धवस्त केला. कुर्ला, सांगली, गुजरातमधील सूरत या ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी २५२ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सांगलीतून पोलिसांनी प्रविण शिंदे (३४), वासुदेव जाधव (३४), प्रसाद मोहिते (२४), विकास मलमे (२५), अविनाश माळी (२८) आणि लक्ष्मण शिंदे (३५) अशा सहा जणांना अटक केली आहे. यातील प्रविण हा मुख्य आरोपी असून मुळचा सांगलीचा असलेला प्रविण परिवारासह मीररोड येथे स्थायीक झाला होता. दहावीपर्यंत शिकलेल्या प्रविणने चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात जाऊन एमडी ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रविणला प्रत्येक किलो मागे एक लाख रुपये मिळत होते. असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

कुर्ला येथे गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पथकाने वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली परवीन बानो शेख (३३) या महिलेला ६४१ ग्रॅम एमडीसह अटक केली. १६ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या कारवाईत १२ लाख २० हजार व २५ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. निरीक्षक आत्माजी सावंत यांनी तिची चौकशी केली असता मीरारोड येथील व्यक्तीकडून हे एमडी घेतल्याचे तिने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मीरारोड येथील एमडी विक्रेता साजीद शेख उर्फ डेबस (२५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा कोटी किंमतीचा तीन किलो एमडी व तीन लाख ६८ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल मिळून आला. त्याच्या चौकशीत तो सुरत येथील दोघांना एमडी विकत असल्याचे समोर आले.

त्यानुसार निरीक्षक शिंदे, उबाळे, सपोनि अमोल माळी, उपनिरीक्षक स्वप्निल काळे, रामदास कदम, शेलार व पथकाने सुरतेला जाऊन इजाजअली अन्सारी (२४) आणि आदिल बोहरा (२२) या दोघांना अटक केली. चौकशीत ते सांगलीतून हा एमडी घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सांगलीतले इरळे गाव गाठून द्राक्षाच्या शेताच्या आड लपून गुपचूप सुरू असलेला एमडीचा कारखाना उद्धवस्त केला. त्याठिकाणी १२२ किलो ५०० ग्रॅम वजनाचा एमडी, एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून सहा जणांना अटक केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.