सुटीला रिव्हॉल्व्हर नेली घरी, पोलिस अंमलदार सक्तीने निवृत्त !
नाशिक : खरा पंचनामा
साप्ताहिक सुटीच्या दिवशी परवानगी न घेता आपली 'सर्व्हिस रिव्हॉल्व्हर' घरी नेणाऱ्या अंमलदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाच्या विभागीय चौकशीच्या आधारे पोलिस नाईक संजय अंबादास भोये यांना सक्तीची निवृत्ती दिली आहे.
संजय भोये हे उपनगर पोलिस ठाणे येथे कार्यरत असताना गेल्या २१ जून २०१९ ला साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे २० जूनला ड्यूटी संपल्यावर त्यांच्याकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर ठाण्यातील कारकून यांच्याकडे जमा करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे न करता रिव्हॉल्व्हर स्वतःसोबत घरी नेली.
याची गंभीर दखल घेताना विनापरवानगी शासकीय पिस्तूल बाळगल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणी श्री. भोये यांची विभागीय चौकशी सुरू होती. चौकशीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आली.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भोये यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांना 'सक्तीने निवृत्त' होण्याची शिक्षा सुनावली. दरम्यान, या निर्णयाबाबत त्यांना साठ दिवसांच्या आत महासंचालक कार्यालयाकडे दाद मागता येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.