सलमानच्या घराजवळ गोळीबार, कॅनडात शिजला कट !
मुंबई : खरा पंचनामा
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी, पहाटेच्या पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान आपल्या कुटुंबीयांसह राहतो. सलमान खानला इशारा देण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात आता मोठ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे पथक दिल्ली, बिहार, जयपूर येथे रवाना करण्यात आले आहेत.
फेसबुक पेजवर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या आयपी अॅड्रेस कॅनडाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर काही तासांनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने एका कथित फेसबुक ऑनलाइन पोस्टमध्ये घटनेची जबाबदारी स्वीकारली आणि हा "ट्रेलर" असल्याचे सांगत इशारा दिला. पोलिसांनी सांगितले की, आयपी अॅड्रेस हा कॅनडातील असला तरी यामध्ये व्हीपीएनचा वापर झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून हा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
रविवारी मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेज लागले असून आरोपींचा चेहराही समोर आला आहे. एका आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती आहे. सलमान खानच्या घरावरील हल्ल्यात विशाल राहुल उर्फ कालूचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.