दोन कोटींची खंडणी घेणाऱ्या पोलिस निरीक्षकाला अटक
मुंबई : खरा पंचनामा
घाटकोपर येथील एका व्यावसायिकाकडे पैशांचा साठा असल्याच्या तक्रारी असून त्याला व त्याच्या कुटुंबियांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. वाशी पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षकालाच खंडणी, अपहरणप्रकरणी अटक झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
नितीन भिकाजी विजयकर (वय ५५, रा. भांडूप पश्चिम, मुंबई) असे अटक केलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. याबाबत राजेश काटरा (वय ५४, रा. घाटकोपर) यांनी तक्रार दिली आहे. शुक्रवार दि. २९ रोजी काटरा त्यांच्या गाडीतून वाशी पुलाखालून पामबीचकडे सर्विस रस्त्याने जात होते. त्यावेळी संशयित पोलिस निरीक्षक नितीन विजयकर यांनी त्यांच्या गाडीच्या पुढे आणि मागे दोन वाहने लावून त्यांची गाडी अडवली. त्यानंतर विजयकर यांच्यासह सोबत असलेल्या सहाजणांनी मुंबई पोलिस असल्याचे काटरा यांना सांगितले.
तसेच विजयकर याने तुमच्याकडे पैशांचा साठा असल्याच्या खूप तक्रारी आल्या आहेत असे सांगितले तसेच त्यामध्ये काटरा यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना अडकवण्याची धमकी दिली. नंतर त्यांना शिवीगाळ करत गाडीतून त्यांना वाशी येथे नेण्यात आले. तेथे काटरा यांना पुन्हा धमकावून त्यांच्याकडून दोन कोटी रूपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले. ही घटना घडल्यानंतर शनिवारी काटरा यांनी याबाबत वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याच्या तपासात विजयकर यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. खंडणीप्रकरणी पोलिस निरीक्षकालाच अटक झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.