'राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव'
जयंत पाटलांचं महाराष्ट्राला पत्र
मुंबई : खरा पंचनामा
गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू असून, राज्यातील जनतेला पाटलांनी एक आवाहनही केलं आहे.
जयंत पाटील यांनी त्यांच्या X (ट्विटर) वर लिहिलेले पत्र जसेच्या तसे...
नमस्कार,
आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व बंधू-भगिनींना सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
अनेक महापुरुषांचा वारसा असणारे आपले महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंकृत राज्य आहे. या राज्यात आपण जन्मलो हे आपले भाग्य. अठरापगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.
संतांच्या वाणीने पावन झालेल्या भूमीत जसे महाकाय सह्याद्री आणि विशाल अरबी समुद्र एकत्र नांदले. तसेच अनेक धर्म, भाषा, साहित्य, संस्कृती एकत्र नांदल्या आणि भरभराटीस आल्या.
येथे राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वीरतेची कथा लिहिली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री-पुरुष समानतेची तोरणे बांधली. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्रियांचा मळवट शिक्षणाने भरला.
छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील विषमतेच्या रेखा पुसट केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर स्वातंत्र्यानंतर घटनेतच समानतेचा अधिकार दिला. हा सर्वसमावेशक समृद्ध वारसा पुढे नेणारे महाराष्ट्र संपूर्ण देशासाठी दिशादर्शक राज्य ठरले.
मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. तत्वांशी तडजोड करत, नीतिमत्तेची चाळण करणारे समाजभेदी विचार डोकं वर काढत आहेत. राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव झाला आहे. सातत्याने होणाऱ्या गुन्हांच्या शृंखलेत राज्य बिथरले आहे.
कृषी संस्कृती आपल्या छातीवर मिरवणारी ही काळी माती संकटात आहे. माझा शेतकरी बांधव हतबल आहे. राज्याचे भविष्य साकारणारा तरुण स्वतःच्याच भविष्याबद्दल अनभिज्ञ आहे. स्वार्थाच्या बाजारात तत्वे, निष्ठा विक्रीस काढण्यात आली आहेत.
या नकारात्मकतेवर मात करायची असेल, तर परिवरर्तनाची वाट धरावी लागेल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या एका मताने परिवर्तनाची तुतारी संपूर्ण महाराष्ट्रात निनादू शकते.
त्यामुळे यंदाच्या पाडव्यासाठी निष्ठेच्या काठीला पुरोगामी विचारांचे वस्त्र बांधुयात. तत्व, नीतिमत्ता यांची हार-फुले चाढवुयात. कडुलिंबाप्रमाणे सत्य कितीही कटू असले तरी त्याच्याच माळा लावुयात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा लखलखीत कलश त्यावर ठेवून लोकशाहीची गुढी सदैव उंच राहील याची प्रतिज्ञा करूयात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.