भाजपने स्टार प्रचारक यादीतून शिंदे, पवार यांना वगळले...
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टारप्रचारकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये 40 जणांची नावे निश्चित करण्यात आली होती.
यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थान देण्यात आले होते. मात्र आता या दोन्ही नेत्यांची नावे या यादीतून वगळण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून शिंदे, पवार यांची नावे नसणार आहेत.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी ही निडणूक होणार आहे. यातील बहुतांश मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीला सामोरे जाताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्या मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. तेथे प्रचाराला सुरूवात देखील करण्यात आली आहे.
26 मार्चला भाजपने निवडणूक आयोगाकडे आपल्या 40 स्टार प्रचारकांच्या नावांची यादी सादर केली होती. यामध्ये राज्याच्या बाहेरील २० जण तर राज्यातील २० नेत्यांचा समावेश होता. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावांचा समावेश होता. पहिल्या दोन क्रमांकावर ही दोन नावे होती. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीची दखल घेत आयोगाने काही सूचना केल्या होत्या त्यानंतर आता भाजपच्या वतीने स्टार प्रचारकांची नवीन यादी निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार यांच्या नावांचा समावेश करण्यात आलेला नाही. राजकीय पक्षांच्या वतीने तयार केल्या जाणाऱ्या स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ स्वतःच्या पक्षातील नेत्यांचा समावेश असावा, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. याबाबत निवडणूक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1950 नुसार स्टार प्रचारक हे त्याच पक्षाचे असले पाहिजे, असा नियम आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.