तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत ८७ माजी अधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला पत्र
नवी दिल्ली : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना, विशेषतः विरोधी पक्षांना समान संधी नाकारली जात असल्याची चिंता ८७ माजी सनदी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचा ठपका या अधिकाऱ्यांनी ठेवला आहे.
तसेच, राजकीय पक्षांवर दबावासाठी तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित करताना या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला, आचारसंहितेच्या काळात तपास यंत्रणा आपल्या अधिकार कक्षेत आणाव्यात, असे आवाहन केले आहे.
निवडणूक आयोगाला पत्र लिहिणाऱ्या माजी सनदी अधिकाऱ्यांमध्ये माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन, ब्रिटनमधील माजी उच्चायुक्त शिवशंकर मुखर्जी, पंजाबचे माजी पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरो, माजी राष्ट्रीय सुरक्षा उप-सल्लागार विजय लता रेड्डी, माजी आरोग्य सचिव के. सुजाता राव, इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख एस. एस. दुल्लत, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, माजी मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्लाह यांचा समावेश आहे.
या माजी सनदी अधिकाऱ्यांनी गुरुवारी आयोगाला पत्र पाठविले होते. आपण कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंध नसल्याचे आणि राज्यघटनेशी कटिबद्धतेचा हवाला या अधिकाऱ्यांनी पत्रात दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक, काँग्रेस पक्षाला प्राप्तिकर विभागाने बजावलेली नोटीस यांसारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. निवडणूक काळात विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची चिंता बोलून दाखविताना तपास यंत्रणांच्या निःष्पक्षपाती कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.