सांगलीत सहा लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त, एकाला अटक
बोलवाड येथे एक्साईजची कारवाई : अधीक्षक प्रदीप पोटे यांची माहिती
सांगली : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज येथील कार्यालयाने मिरज तालुक्यातील बोलवाड येथे सहा लाख रूपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. दारूची वाहतूक करणारी गाडी जप्त करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
अजित मुरगाप्पा कट्टीकर (वय २४, रा. लक्ष्मीनगर, मालगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यांच्या सीमेवर तपासणी नाके सुरू केले आहेत. शिवाय त्यांची भरारी पथकेही जिल्ह्यात गस्त घालत आहेत. शुक्रवारी बोलवाड परिसरात एका मारूती कारमधून (एमएच १० एएन ३७९४) गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या मिरज कार्यालयातील निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. त्यांनी मिरज बोलवाड रस्त्यावर गस्त सुरू केली.
शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास बोलवाडजवळ मिळालेल्या माहितीनुसार मारूती कार आल्यानंतर पथकाने ही कार थांबवली. या कारची तपासणी केली. त्यामध्ये गोवा बनावटीची विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. या दारूबाबत चौकशी केल्यानंतर कार चालक कट्टीकर याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कारसह गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चालक कट्टीकर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) ९० व १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाने मिरजेचे निरीक्षक दीपक सुपे, दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, जितेंद्र पवार, सहायक दुय्यम निरीक्षक शरद केंगारे, स्वप्नील आटपाडकर, संतोष बिराजदार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.