घटस्फोट न घेता पोलिसाने दुसरीशी केला विवाह; न्यायालयाने फटकारले
मुंबई : खरा पंचनामा
दोन बायका फजिती ऐका, असाच काहीसा प्रकार मुंबईतील एका पोलीस हवालदाराकडून घडला आहे. पहिली पत्नी व मुले असताना पोलिसाने परस्पर दुसरा विवाह केला असून सर्व्हिस रेकॉर्डवर दुसऱ्या पत्नीचे नाव चढवले आहे.
घटस्फोट न घेताच नवऱ्याने हा प्रताप केल्याने पहिल्या पत्नीने न्यायालयाचे दार ठोठावले असून उच्च न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह राज्य सरकारला न्यायालयाने फैलावर घेत पतीच्या सर्व्हिस रेकॉर्डवर पहिल्या पत्नीचे नाव चढवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
पोलीस दलात हवालदार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्याला एक मुलगी देखील आहे. संसारात वाद सुरू झाल्यानंतर काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात पोटगीचा खटला प्रलंबित असतानाच संबंधित पोलीस हवालदाराने परस्पर दुसरा विवाह केला. त्या दोघांना दोन मुले असून पोलिसाने आपल्या पश्चात सर्व्हिस दुसऱ्या पत्नीला मिळावी यासाठी तिचे नाव सर्व्हिस रेकॉर्डवर चढवले.
हा प्रकार कळताच पहिल्या पत्नीने ऍड राजाराम बनसोडे, ऍड शीतल उबाळे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला त्यावर न्या. राजेश पाटील यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. हा प्रकार निदर्शनास येताच न्यायालयाने संबंधित पोलीस हवालदारसह सरकारला फटकारले इतकेच नव्हे तर सर्व्हिस रेकॉर्डवर पहिल्या पत्नीचे नाव लवकरात लवकर नोंदविण्याचे निर्देश देत या प्रकरणावरील सुनावणी ६ मे रोजी निश्चित केली.
न्यायालय काय म्हणाले - पोलीस प्रशासनात हे काय चालले आहे? पोलिसच असे करत असतील तर लोकांचे काय? लोकांमध्ये काय संदेश जाईल. पोलीस प्रशासनाकडून ही घोडचूक होऊच कशी शकते, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.