"'जय भवानी' शब्द काढणार नाही, आधी मोदी, शहांवर कारवाई करा..."
मुंबई : खरा पंचनामा
मशाल प्रचार गीतात जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा आहे. त्यात असलेला जय भवानी शब्द काढा, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. आम्ही जय भवानी शब्द कोणत्याही परिस्थितीत काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल, तर मोदी आणि शहांवर आधी कारवाई करा. महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केला, हा आरोप मी केला, तर यावर निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे का? तुम्ही आम्हाला वैरी केलंत, जनता बघून घेईल. पण महाराष्ट्राच्या दैवताचा उल्लेख करायचा नाही. जय भवानी, जय शिवाजी या घोषणेतील जय भवानी शब्द काढायला लावत आहेत. उद्या तुम्ही जय शिवाजी शब्द काढायला लावाल, तर अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्विकारणार नाही. आम्ही लढाई लढत राहू, असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
पत्रकार परिषदेत ठाकरे पुढे म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकची निवडणूक झाली. आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. शिवसेनाप्रमुखांचं निवडणूक लढवण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना निवडणूक आयोगाने काढून घेतला होता. त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवायला बंदी केली होती. त्या काळात त्यांनी हिंदुत्त्वाचा प्रचार केला, असा ठपका ठेवला होता. त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री उघडपणे धार्मिक प्रचार करत आहेत. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती की, यांना तुम्ही काही सूट दिली आहे का? निवडणुकीच्या कायद्यात काही बदल केला आहे, कारण पूर्वी आम्हालाही असा अनुभव आला होता.
नरेंद्र मोदी म्हणालेत, बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटण दाबा. अमित शहा म्हणाले, तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडवू. आम्हीसुद्धा रामभक्त आणि हनुमानभक्त आहोत. आई तुळजाभवानी महाराष्टाचं कुलदैवत आहे. तुळजाभवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिलं. भवानी तलवारीचा प्रसंगही सर्वांच्या हृदयात कोरला गेला आहे. जय भवानी, जय शिवाजी, ही घोषणा प्रत्येकाच्या हृदयात आहे. उद्या आम्ही हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी असं बोललो तर निवडणूक आयोगाचा आक्षेप असता कामा नये.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.