Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपासह अन्य पक्षांना कोट्यवधींचा निधी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगविरुद्ध गुन्हा

भाजपासह अन्य पक्षांना कोट्यवधींचा निधी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगविरुद्ध गुन्हा



नवी दिल्ली : खरा पंचनामा

जगदलपूर येथील पोलाद प्रकल्पाशी संबंधित कामांचे सुमारे १७४ कोटींचे बिले मंजूर करण्यासाठी ७८ लाखांची लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या विरोधात एफआयआर दाखल केला.

मेघा इंजिनीअरिंगशिवाय एनआयएसपी आणि एनएमडीसीचे आठ अधिकारी व मेकॉनच्या दोन अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलाद प्रकल्पातील पाइपलाइन व पंपहाउसच्या कामासाठी मेघा इंजिनीअरिंगला ३१५ कोटींचे कंत्राट मिळाले होते. या कामासंदर्भातील प्रलंबित ७३ बिले मंजूर करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने ऑगस्ट २०२३ मध्ये तपास सुरू केला होता. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे, ३१ मार्च रोजी नियमित खटला दाखल करण्यात आला. त्यानुसार, १७४ कोटींची बिले मंजूर करण्यासाठी कंपनीने ७८ लाखांची लाच दिल्याचे उघड झाले.

सीबीआयने एनआयएसपी व एनएमडीसीच्या आठ अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल केला. त्यांनी ७३.८५ लाखांची लाच स्वीकारली, तर मेकॉनच्या दोन अधिकाऱ्यांनी ५.०१ लाखांची लाच घेतल्याचे तपासात उघड झाले.

मेघा इंजिनीअरिंगने मागील ५ वर्षांत सुमारे ९६६ कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे नुकतेच उघड झाले होते. रोखे खरेदी करणारी ही दुसरी मोठी कंपनी ठरली होती. 'मेघा'ने भाजपला सर्वाधिक ५८६ कोटी, बीआरएस १९५ कोटी, द्रमुक ८५ कोटी, वायएसआर ३७ कोटी, तर काँग्रेसला १७ कोटींचे रोखे दिले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.