सरकारी अनुदानाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या सराईतास अटक
दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
तासगाव तालुक्यातील कौलगे येथील एका महिलेला सरकारी अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेला दुचाकीवरून नेऊन तिचे दागिने लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणत दागिने, दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
विशाल कल्लाप्पा कांबळे (वय ४५, रा. चिंचली, जि. बेळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. ७ एप्रिल रोजी संशयित विशाल याने कौलगे येथील शोभा कोरटे सरकारी अनुदान तसेच पेन्शन मिळवून देतो असे सांगून त्यांना दुचाकीवरून नेले. काही अंतरावर गेल्यानंतर विशाल याने कोरटे यांच्याकडील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. नंतर तेथून निघून गेला. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारचे गुन्हे जत तालुक्यातही घडले होते. त्यामुळे निरीक्षक शिंदे यांनी यातील संशयितांना पकडण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते.
पथक संशयितांचा शोध घेत असताना सांगलीतील शिवशंभो चौक ते कनार्ळ रस्ता परिसरात एकजण विना क्रमांकाची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात दागिने आढळून आले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने कौलगे येथील महिलेची तसेच जत येथील विठ्ठलनगर येथील एका महिलेची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडील दुचाकी, दागिने असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर लवटे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, अमर नरळे, उदयसिंह माळी, संदीप नलवडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.