मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेख
वाराणसी : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी, 14 मे रोजी वाराणसीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच 1 जून रोजी मतदान होणार आहे.
मोदींनी दाखल केलेल्या अर्जाबरोबर त्यांनी संपत्ती आणि खासगी माहिती देणारं प्रतिज्ञापत्रही दाखल केलं आहे. यामध्ये मोदींनी त्यांची एकूण संपत्ती किती आहे यासंदर्भातील माहिती दिली आहे. शिक्षण किती झालं आहे, गुन्हेगारी प्रकरणा दाखल आहेत की नाही, वय, व्यवसाय यासारख्या तपशीलाबरोबर संपत्तीचं सविस्तर विवरण या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या प्रतिज्ञापत्रामध्ये मोदींनी पत्नी म्हणून जशोदाबेन यांचा उल्लेख करत त्यांच्या संपत्तीसंदर्भात दोन शब्दांमध्ये माहिती दिली आहे.
मोदींनी आपल्याकडे एकूण 3 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आपली एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख रुपये असल्याचं नमूद केलं आहे. स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून आपल्याकडे 3.02 कोटींची संपत्ती आहे असं मोदींनी म्हटलं आहे. यापैकी सर्वाधिक वाटा हा भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआयच्या खात्यात आहे. मोदींनी 2 कोटी 89 लाख 45 हजार 598 रुपये एसबीआयच्या फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत असं नमूद केलं आहे. तसेच मोदींनी आपल्याकडे 52 हजार 920 रुपये कॅश असल्याचं सांगितलं आहे. गांधीनगर आणि वाराणसीमध्ये आपली दोन बँक खाती असून त्यामध्ये 80 हजार 304 रुपये आहेत, अशी माहिती मोदींनी दिली आहे. मोदींकडे असलेल्या संपत्तीमध्ये 45 ग्राम वजनाच्या 4 सोन्याच्या अंगठ्याही आहेत. या सोन्याच्या अंगठ्यांची किंमत 2 लाख 67 हजार रुपये इतकी आहे. मोदींकडे 9 लाख 12 हजार रुपये हे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या माध्यमातून आहेत.
मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये पत्नी म्हणून जशोदाबेन यांच्या नावाचा उल्लेख आहे. जशोधाबेन यांच्याकडे सध्या किती संपत्ती आहे यासंदर्भातील माहिती देताना मोदींनी, 'ठाऊक नाही' अशी नोंद केली आहे. मोदी आणि जशोदाबेन एकत्र राहत नाहीत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.