सचिन तेंडूलकरच्या बॉडीगार्ड आत्महत्या प्रकरणाला नवे वळण
जळगाव : खरा पंचनामा
सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या प्रकाश गोविंदा कापडे वय 37 यांनी गेल्या आठवड्यात बुधवारी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.
ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनातूनच त्यांनी स्वतःला संपवल्याचं प्राथमिक कारण समोर आलं आहे. आता या प्रकरणावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरचं नाव घेत पोस्ट केलीय.
सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक असणाऱ्या प्रकाश गोविंदा कापडे याच्या आत्महत्या प्रकरणावरून आता आमदार बच्चू कडू यांनी थेट सचिन तेंडुलकरला आता तरी जागा हो असं म्हणत एक बातमी पोस्ट केलीय. प्रकाश कापडे याने ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे आत्महत्या केली, त्याच ऑनलाइन गेमिंगची जाहिरात सचिन करतोय. त्याने भारतरत्न पुरस्काराची मर्यादा न पाळता जाहिरात सुरू ठेवली. आता अंगरक्षकाने जीवनं संपवले. सचिन तुझा निषेध असो, आता तरी जागा हो... असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
प्रकाशचे वडील गोविंद कापडे यांनी मुलाच्या आत्महत्या प्रकरणावर बोलताना सांगितलं की, प्रकाशला ऑनलाइन रमी खेळण्याचं व्यसन होतं. त्यात पैसे गमावल्याने काही वर्षांपूर्वी प्लॉट विकला. त्यानंतर लोकांची देणी दिली. तेव्हापासून सगळे व्यवहार सुनेकडे दिले. जेव्हा जेव्हा त्याच्याकडे चौकशी करायचो तेव्हा सगळं सुरळीत असल्याचं प्रकाश सांगायचा. पण अचानक त्यानं आत्महत्या केल्यानं कुटुंब उद्धवस्त झालंय.
बच्चू कडू यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, भारतरत्न असणाऱ्या सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करु नये म्हणून आम्ही खुप विनंती केली. प्रसंगी त्याच्या घराबाहेर आंदोलनही केले. परंतू तेंडुलकरने भारतरत्न पुरस्काराची मर्यादा न पाळता ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सुरूच ठेवली. याच ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे प्रकाश कापडे या सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने स्वतःचे जीवन संपवले.
प्रकाश कापडे हे SRPF मध्ये भरती झाले होते. त्यानंतर त्यांची पोस्टिंग होऊन ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे बॉडी गार्ड म्हणून कर्तव्यावर होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
सचिनच्या ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातीवरून याआधी बच्चू कडू यांनी सचिनच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं. सचिनला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच्याकडून जुगारासारख्या गोष्टीला प्रोत्साहन देणं हे योग्य नाही. भारतरत्न पुरस्काराचा हा अपमान असून त्याने भारतरत्न परत द्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.