आमदार पी. एन. पाटील अनंतात विलीन
हजारोंच्या साक्षीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील आज (23 मे) अनंतात विलीन झाले. सडोली खालसा या मुळ गावी पाटील यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राहुल पाटील यांनी पाटील यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. रविवारी राहत्या घरी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. यानंतर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तातडीची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर पण गंभीर होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूची झुंज अपयशी ठरली.
राज्य सरकारच्या वतीने उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे उपस्थित होते. लातूरचे आमदार धीरज देशमुख सुद्धा उपस्थित होते. सांगलीचे विशाल पाटील देखील उपस्थित होते. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास पाटील यांची प्राणज्योत मालवली. आमदार पाटील यांच्या मुळ गावी सडोली खालसामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला आमदार पी. एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची सूचना दिल्या होत्या.
पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी श्रीमंत शाहू महाराज, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराज, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, धीरज देशमुख, माजी आमदार चंद्रदीप नरके आदींनी भावना व्यक्त केल्या. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष आबाजी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आमदार अमित देशमुख यांनी वडिल स्वर्गीय विलासराव देशमुख आणि पी. एन. पाटील यांच्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.