हिंदू-मुस्लिम, राज्यघटना या मुद्यांपासून दूर राहा; नड्डा, खर्गे यांना आयोगाची नोटीस
नवी दिल्ली : खरा पंचनामा
जात, समूह, भाषा व धार्मिकतेच्या आधारावर तसेच देशाची राज्यघटना धोक्यात असण्यासारखे मुद्दे भाजप व काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी सातत्याने मांडणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करून आज केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावली आहे.
पक्षांच्या स्टार प्रचारकांकडून वारंवार या मुद्द्यावरून वक्तव्य दिले जात असल्याने सामाजिक व सांस्कृतिक वीण उसविण्याची शक्यता असल्याचे मत निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे. यापासून आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांना दूर ठेवण्याची जबाबदारी या दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांची असल्याचे दोन वेगवेगळ्या नोटिशीत म्हटले आहे.
राजस्थानमधील बांसवाडा येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू-मुस्लिम समाजात दुही पसरविणाऱ्या भाषणाच्या विरोधात काँग्रेसने दिलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस बजावली होती. जवळपास एक महिन्यानंतर निवडणूक आयोगाने भाजपने दिलेले उत्तर फेटाळून लावले. भाजपच्या स्टार प्रचारकांनी धार्मिक व जातीय आधारावर प्रचारापासून दूर राहिले पाहिजे, अशी तंबी दिली आहे.
समाजात दुही निर्माण होईल, असे भाषणे देणे स्टार प्रचारकांनी थांबवावे, असेही निवडणूक आयोगाने भाजपला सुचविले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सुद्धा निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
काँग्रेसने दिलेले स्पष्टीकरणही निवडणूक आयोगाने फेटाळून लावले असून काँग्रेसने संरक्षण दलाच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये. तसेच संरक्षण दलातील सामाजिक व आर्थिक स्थितीबद्दल समाजामध्ये दुष्प्रचार करू नये, असे सुचविले आहे. राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरून केंद्र सरकारवर टीका केली होती.
त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्षांनी स्टार प्रचारक राहुल गांधी व त्यांच्या उमेदवारांनी देशाची राज्यघटना नष्ट करण्यात येईल किंवा विकल्या जाईल, असे वक्तव्य करण्यापासून दूर राहावे, असे निवडणूक आयोगाने सुचविले. भाजप सत्तेत आल्यास राज्यघटना बदलण्यात येईल, असा मुद्दा प्रत्येक प्रचारसभेत राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.