मिरज, ठाण्यात घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक
१७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यासह ठाण्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिरज, ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आणून १७.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
अमित राकेश पंचम (वय ३०, रा. वानलेसवाडी, सांगली, मूळ रा. राबोडी, ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेले घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. हे पथक घरफोडी, चोरीतील संशयितांचा शोध घेत होते.
त्यावेळी पथकाला एक तरूण मिरज-अर्जुनवाड रस्त्यावरील पुलाखाली चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने या परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी पथकाने पुलाखाली संशयास्पदरित्या उभारलेल्या अमित पंचम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने मिरज आणि ठाणे येथे घरफोडी करून चोरल्याची कबुली दिली. दागिने जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, अमोल लोहार, संकेत मगदूम, सोमनाथ गुंडे, प्रकाश पाटील, अजय बेंदरे, सोमनाथ पतंगे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.