पैसे वाटताना गाडीसह कार्यकर्ते पकडले; भोरमध्ये मोठा गोंधळ
पुणे : खरा पंचनामा
आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आकरा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. बारामती मतदारसंघात देखील आज मतदान होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर शहरात पैसे वाटताना गाडीसह काही कार्यकर्ते सापडल्यानं गोंधळ उडाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या आरोपानंतर राष्ट्रवादी आणि मविआचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं.
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी एकापाठोपाठ दोन ट्विट करत राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे. 'बारामती मतदारसंघात चक्क पोलिस 'बंदोबस्तात' पडतोय पैशांचा पाऊस... यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय... यामध्ये भोर तालुक्यातील 'अजितदादा मित्रमंडळा'चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत...' असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान पैशांचं वाटप होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून वाहनाची तोडफोड करत चौघांना मारहाण देखील करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडलेली 3 चारचाकी वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.