साडेसात हजारांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला अटक
पलूस येथे सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
तलाठ्यांनी घातलेली सातबाऱ्यावरील नोंद मंजूर करण्यासाठी साडेसात हजार रूपयांची लाच घेताना पलूस येथील मंडल अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला रंगेहात अटक करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
मंडल अधिकारी तानाजी शामराव पवार (वय ५२, रा. पवार गल्ली, पलूस), खासगी व्यक्ती प्रसाद गजानन चव्हाण (वय ५४, रा. आमणापूर रोड, बुर्ली, ता. तासगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या मित्राने खरेदी केलेल्या जमिनीची तलाठ्यांनी नोंद घातली आहे. ती नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी पवार आणि चव्हाण यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच देणे मंजूर नसल्याने त्यांनी याबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंडल अधिकारी पवार यांच्यासाठी त्यांचा मदतनीस असणारा खासगी व्यक्ती चव्हाण याने तक्रारदाराकडे दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून त़डजोडीअंती साडेसात हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारताना चव्हाण याला पलूस येथील तहसील कार्यालय परिसरात रंगेहात पकडण्यात आले. शिवाय मंडल अधिकारी पवार यांच्यासाठी ती लाच घेतल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, प्रितम चौगुले, अजित पाटील, राधिका माने, ऋषीकेश बडणीकर, सलीम मकानदार, धनंजय खाडे, चंद्रकांत जाधव, उमेश जाधव, अतुल मोरे, सीमा माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.