Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बीडमधील कार्यकारी अभियंत्याच्या मिरजेतील लॉकरमध्ये सापडले घबाड! पावणे दोन कोटींचे सोने, रोकड जप्त

बीडमधील कार्यकारी अभियंत्याच्या मिरजेतील लॉकरमध्ये सापडले घबाड!
पावणे दोन कोटींचे सोने, रोकड जप्त



बीड : खरा पंचनामा

पाच शेतकऱ्यांकडून २८ हजार रूपयांची लाच घेणारा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याच्या मिरज (जि. सांगली) येथील युनियन बँक ऑफ इंडिया बँकेच्या लॉकरमधील मोठे घबाड शुक्रवारी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे. लॉकरमध्ये तब्बल सव्वा दोन किलो सोने आणि रोख रक्कम अशी पावणे दोन कोटी रूपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे.

राजेश आनंदराव सलगरकर (वय ३५, सध्या रा. अंबाजोगाई, मूळ रा. मिरज, जि. सांगली) हा परळी येथील माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. तो वर्ग १ चा अधिकारी आहे. तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील इतर पाच शेतकऱ्यांचे चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याची परवानगी देण्यासाठी सलगर याने प्रत्येकी २८ हजार रुपयांची लाच घेतली होती. एसीबीने २२ मे रोजी खात्री करून कारवाई केली होती.

त्याच्याविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, अविनाश गवळी, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे यांनी केली होती.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील मिरज येथील सलगरकर हा रहिवाशी आहे. त्याचे बँकेतील लॉकरची शुक्रवारी झडती घेण्यात आली. यामध्ये रोख ११ लाख ८९ हजार रूपये, २ किलो १०५ ग्रॅम सोने ज्यामध्ये १११४ ग्रॅमचे ७ बिस्कीटे आणि ९९१ ग्रॅमचे इतर दागिन्यांचा समावेश आहे. या झडतीमध्ये तब्बल १ कोटी ६१ लाख ८९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.