Covishield वादात अन् CoWIN प्रमाणपत्रावरून मोदींचा फोटो गायब!
लोकांच्या प्रश्नावर आरोग्य मंत्रालयाचं उत्तर
नवी दिल्ली : खरा पंचनामा
कोविड-19 लसीकरणानंतर दिल्या गेलेल्या CoWIN प्रमाणपत्रावरून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकला आहे. यापूर्वी करोनावर भारताचा विजय अशा आशयाच्या वाक्यांसह मोदींचा फोटो या प्रमाणपत्रांवर छापण्यात आला होता. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, आता 'एकत्रितपणे भारत कोविड- १९ ला हरवेल' हे वाक्य जरी ठेवलं असलं तरी आता मोदींचं नाव व फोटो हे काढून टाकण्यात आला आहे.
एकीकडे, लस उत्पादक AstraZeneca ने UK न्यायालयात कोविशील्ड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांची चर्चा सुरु केली असतानाच कोवीनच्या प्रमाणपत्रांमध्ये केलेला हा बदल लक्ष वेधून घेत आहे. AstraZeneca ने कोविशील्डमुळे थ्रोम्बोसिस विथ थ्रॉम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS), रक्त गोठणे यासारखे त्रास होऊ शकतात असा दावा केला आहे. या चर्चादरम्यान, अनेकांनी त्यांच्या लसीकरण प्रमाणपत्रांची तपासणी केली आहे.
X (पूर्वीचे ट्विटर) वरील काही वापरकर्त्यांनी कोविडच्या लसीच्या प्रमाणपत्रातील हा लक्षणीय बदल अधोरेखित करत आपलं मत व्यक्त केलं आहे. आम्ही आता फक्त प्रमाणपत्र तपासण्यासाठी डाउनलोड केलं होतं पण मोदींचा फोटो गायब झाला आहे आणि तिथे फक्त क्युआर कोड दिसत आहे अशा कॅप्शनसह अनेकांनी आपल्या प्रमाणपत्रांचे फोटो ऑनलाईन शेअर केले आहेत.
याप्रकरणी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिका-यांनी मंगळवारी ThePrint ला सांगितले की, सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही प्रतिमा लस प्रमाणपत्रातून काढून टाकण्यात आली आहे.
दरम्यान, कोविड लसीकरण प्रमाणपत्रांवरून मोदींचा फोटो काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२२ मध्ये, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये जारी केलेल्या लसीकरण प्रमाणपत्रांमधून मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला होता. ही कारवाई भारतीय निवडणूक आयोगाने त्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे केली होती.
तर मुळात, लसीकरण प्रमाणपत्रांवर मोदींचा फोटो छापण्यावरून यापूर्वी २०२१ मध्ये वाद निर्माण झाला होता. केरळ उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी चालू असताना, इतर देशांमध्ये जारी केलेल्या प्रमाणपत्रांमध्ये निवडून आलेल्या नेत्यांचे फोटो नसल्याचे म्हणत मोदींनी प्रसिद्धीसाठी कोविड लसीकरणाच्या प्रमाणपत्राचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायमूर्ती पीव्ही कुन्हीकृष्णन यांनी यावर उत्तर देताना 'त्यांना त्यांच्या पंतप्रधानांचा अभिमान नसावा, आम्हाला आमच्या पंतप्रधानांचा अभिमान आहे,' असं म्हटलं होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.