Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ऑनलाइन लुटीसाठी 'खाकी'चा वापर; एक लाख लंपास

ऑनलाइन लुटीसाठी 'खाकी'चा वापर; एक लाख लंपास



मुंबई : खरा पंचनामा

गेल्या काही दिवसांत पोलिसांच्या गणवेशात व्हिडीओ कॉल करून मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशाच प्रकारे घाटकोपरमधील एका कॉलेजमधील कर्मचाऱ्याला एक लाखाला गंडविल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी घाटकोपरपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनील गुप्ता (४१) याच्या तक्रारीनुसार, २ जूनला त्याला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल आला. कॉल उचलताच समोर दोन जण पोलिसांच्या गणवेशात होते. त्यांनी दिल्ली गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगून, गुप्ता याच्या आधारकार्डचा वापर करत अनेक बँक खाते उघडल्याचे सांगितले.

बँक खात्यांद्वारे मनी लाँड्रिंग झाल्याने रिझर्व्ह बँककडूनही त्या व्यवहारांची तपासणी होणार असल्याचे दोघांनी गुप्ता यांना सांगितले.

खात्यातील पैशांची तपासणी केल्यानंतर त्यात दोषी आढळल्यास तत्काळ अटकेची कारवाई होणार असल्याची भीती घातली. उद्या जॉर्ज मॅथ्यू, आयपीएस अधिकारी कॉल करतील, असे सांगून त्यांनी कॉल कट केला.

३ जून रोजी व्हॉट्सअॅपवर मॅथ्यू नावाच्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. त्याने गुप्ताच्या नावाने सहा बँक खाती सुरू असून त्यात काळा पैसा असल्याचे भासवून चौकशी सुरू केली.

तपासणीच्या नावाखाली एक लाख पाठविण्यास भाग पाडले. सांगितल्याप्रमाणे अर्ध्या तासात हे पैसे परत खात्यात न आल्याने त्यांनी याबाबत चौकशी केली तेव्हा, सर्व्हर खराब असल्याचे कारण सांगत २४ तासांत पैसे जमा होणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, पैसे जमा न झाल्याने त्यांना संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने १९३० क्रमांकावर कॉल करून घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.